Tuesday, April 30, 2024

कवितेला कधी जाऊदे म्हणायचं नसतं....

"प्रिय भाई एक कविता हवी आहे"
एक सर्वांग सुंदर अनुभव......!

कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं हे एकदम पटलं !
 माझ्या शब्दात.....👇

कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!
आकाश गडगडतं, आणि काळे ढग साचतात..... तेव्हा मनाचं कवाड बंद करायचं नसतं,
शब्दांच्या वर्षावात मनसोक्त न्हावून घ्यायचं असतं 
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!

चाफ्याचं झाड जेव्हा स्वप्नात येतं, तेव्हा
ओंजळ फुलांनी भरून घ्यायची असते.
कवितेचा आनंद आणि सुगंध पसरवायचा.
कैवल्याच्या चांदण्यांचं लेणं अंगभर मिरवायचं,
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!

आठवणींवर साठवलेली धूळ झटकायची,
कवितेचा शोध चालूच ठेवायचा !
कवितेचं देणं आणि घेणं लुप्त होऊ द्यायचं नसतं.
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!
✍️ सुजाता

Saturday, January 13, 2024

या प्रेमाचं काय करायचं ?......

*या प्रेमाचं काय करायचं.....?*
या प्रेमाचं काय करायचं.....
ते एकतर असतं, किंवा अजिबात नसतं,
ते ठरवून होत नै,
आणि जबरदस्तीनी तर जराही होत नै.
ते लपवता येत नै,
आणि त्याचा दिखावा पण करता येत नै.
तू केलंस, तरच मी करीन, असा Business करता येत नै,
की मी करत्येय, म्हणून तू पण कर, अशी सक्ती पण करता येत नै.
हिला त्याच्यावर आणि त्याला माझ्यावर प्रेम कर असं सांगता येत नै,
तसंच, त्याच्यावर करू नकोस, असं Emotional Blackmail ही करता येत नै.
मग या प्रेमाचं करायचं तरी काय ....?
तर ते नुस्तं Enjoy करायचं.....
मनसोक्त हुंगायचं.... त्याचा आनंद लुटायचा...!
अटींपलीकडे करायचं,
मरेपर्यंत करायचच, पण मेल्यावरही करायचं ! 
प्रेम जगायचं !!
मला तर वाटतं, Meditation प्रमाणेच
प्रेम करायचं नसतं, तर ते आपोआप होत असतं...!
मी प्रेम करते, असं नव्हे, 
तर मीच प्रेम आहे !!
✍️ सुजाता.

Tuesday, December 19, 2023

काही सांगायचंय मला....

काही सांगायचंय,..... मला काही सांगायचंय.... काही सांगायचंय मला, तुला,... काही सांगायचंय !
काही शब्दांच्या पलीकडलं काही बोलायचं राहिलेलं,‌‌
काही घडायचं राहिलेलं, ....अन् काही घडून गेलेलं
काही सांगायचय मला, .....तुला, काही सांगायचंय !
काही तुला न समजलेलं,.....
 काही समजायच्या पलीकडलं....
काही मलाच नीट उमगलेलं..... काही सांगायचंय !
 पण आता मला जाणवतंय, 
कदाचित तुला ते समजतंय...हळुवारपणे उलगडतंय
कोंदटलेलं उघडतंय,...... अंधारलेलं उजाडतंय....
एक हलकंसं स्मित उमटतंय, धुकं जसंकाही विरतंय,
आता कशाला काही सांगायचं..... 
कशाला उगीच बोलायचं.....
आता मनीचं गूज ऐकायचं, मनाचं गूढ उलघडायचं..
कशाला उगीच बोलायचं.....
आता कशाला काही सांगायचं.....
✍️ सुजाता

Thursday, December 7, 2023

अंधार

हे बरे झाले, देवा, 
दिला अंधार तू इतका मला....
वाट माझी शोधावया, 
झालो मी स्वतः दिवा...!
काटेरी वाटेवरूनी मी, 
चाललो एकटा असा....
स्वतःच बनलो ऊर्जा, 
अन् झालो मी माझा सखा !
हे बरे झाले, देवा,
 दिला अंधार तू इतका मला....
एक ठिणगी आंत माझ्या, 
लागली उजळायला !
या प्रवासाची दिशा, 
आता नको बदलायला,
जन्म जावा लागतो 
ही सार्थता समजायला.
नाकारले जाण्यातला 
दर्द ज्याने ओळखला,
रिते होण्यातला आनंदही  
त्यालाचच हो, उमगला !
प्रेमातही अन् द्वेषातही, 
माझा जीव होता अडकला,
मीच केले मोकळे, 
त्यांना ही, आणि स्वतः ला !
✍ सुजाता

Tuesday, November 14, 2023

दिवा

दिव्याच्या वाती सारखं आयुष्य जगावं .....
दिव्याची वात तेलामध्ये आकंठ बुडालेली असते,
पण तिचं टोक मात्र तेलाबाहेरच असतं,
त्यामुळेच तर ती पेटते, उजेड देते ....... 
तेलात पूर्णपणे बुडालेली वात कशी बरं प्रकाश देईल ?
मला वाटतं आपणही तसंच जगावं.....
बाहेरच्या जगात कितीही गुंतलो,
तरी मनातून मात्र थोडं अलिप्तच असावं.
मग बघा आपलं आयुष्य कसं उजळेल..... आणि 
आपण इतरांची आयुष्यही उजळवून टाकू..
एक दिवा स्नेहाचा, आपल्या हृदयात,....
एक दिवा सहानुभूतीचा - इतरांबद्दलच्या..
एक दिवा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा....
एक दिवा कृतज्ञतेचा.... 
✍️ सुजाता

Sunday, November 12, 2023

पालखीचे भोई

कितीही मिळालं तरी, कधी पुरेसं होतं नाही....
अजून हवं अजून हवं, हांव काही संपत नाही.
हवं ते मिळालं, तर कधी संपेल, समजत नाही,
कितीही जपून ठेवलं, तरी भय काही सरत नाही.
क्रोध जाता जात नाही, मत्सर कमी होत नाही,
कित्ती विचार केला तरी विवेक काही येत नाही.
मनाला दाबून ठेवलं तरी उसळी मारतच राही,
कंट्रोल केलं, तरी आवाक्यात रहात नाही !
काय केलं, तर वासना संपतील, 
काही केल्या उमगत नाही.....
मनःशांती कशी मिळेल, हे काही कळत नाही !
अंतरात्म्यास विचारून पाही,
तूच उपाय सुचव काही.....
भक्तिमार्गावर पाऊल ठेवता, कोलाहल शांत होई
"करविता" कळताच, "कर्ता भाव" गळत जाई..
'मी' 'मी' चे तुणतुणे आता फारसे वाजत नाही,
उमगते आपल्याला, आपण तर पालखीचे भोई,
               आपण तर पालखीचे भोई .....!!
✍️ सुजाता 

Sunday, November 5, 2023

Mibile

मोबाईल प्रमाणेच, आपल्या मनावरही
मधूनमधून Antivirus फिरवावा,
आपलं Mind Cool करावं ....
नको असलेल्या, निराशाजनक
 Junk Files Clear कराव्यात,
द्वेशाचे, मत्सराचे Caches Clean करावेत.
म्हणजे मग बघा, आयुष्य कसं Boost होईल...
✍️ सुजाता 😃