नव वर्षाचा संकल्प....
इतरांप्रमाणेच मीही नवीन वर्षाचा संकल्प करायचे....रोज ड़ायरी लिहायची, लवकर उठायचं, exercise करायचा, dieting करायचं,...वगैरे वगैरे,...आणि 7-8 दिवसांत मोड़ायचेही....!
या वर्षी विचार करताना वाटलं, की काहीतरी वेगळं करावं....
आत्ताचं गेलं वर्ष, वळून बघताना, मनात आलं,की कसं गेलं हे वर्ष....? काही दुःखाचे, अगदी आयुष्य उध्वस्त करणारे क्षण या वर्षभरात येऊन गेले, पण जमाखर्च मांडायचा झाला, तर सुखाची, आनंदाची बाजू जराशी जड़च भासली....
माझी लाडकी लेक ड़ाॅक्टर झाली, आणि मुंबईतच J. J. Hospital मध्ये internship करायला लागली....
कित्येक नव्या ओळखी झाल्या...Rotary, सखी मंड़ळ, 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान .....
नवीन "दालनं" खुली झाली....
माझ्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी मिळाली !
माझ्या आयुष्याची "second inning" सार्थकी लावणारा माझा "स्वामी आधार वर्धिनी आश्रम".....समाजाचं "ऋण" फेडण्याची संधी मिळाली....
आयुष्याला काही ध्येय मिळालं,
जगण्याला अर्थ मिळाला,
जीवन समृद्ध झालं....
तप्त ऊन्हानंतर आलेल्या पावसाच्या हलक्या सरीलाही किती किंमत असते, ते जाणवलं.
मन एवढं Mature झालं नसलं, तरी Process तरी सुरू झाली .....
आवडत्या कामात स्वतःला झोकून देणं, म्हणजे सुद्धा "Meditation" ! ही नवी व्याख्या समजली....
कवितेतून स्वतःला शोधायला लागले...
धडपडत, अडखळत, स्वतःलाच सावरत पुढे जायला शिकले. स्वतःच्या मर्यादा ओळखायला आणि इतरांच्या स्विकारायला शिकले....
"त्याचं" अस्तित्व छोट्या छोट्या गोष्टीत जाणवायला लागलं, माझी 'बाग', निसर्ग, आणि आवडती 'गाणी' यात रमायला लागले,
म्हणजे जणू, मीच मला भेटले, मीच माझ्याशी 'मैत्री ' केली !
असं जाणवलं, की आपण चांगल्या गोष्टींचा विचार केला, की जास्त चांगलं घड़ायला लागतं....The Law of Abundance !
आता मी ठरवत्येय की रोज एकतरी चांगली घडलेली घटना , आनंदाचा प्रसंग लिहून ठेवायचा ! बघताबघता आनंदी क्षणांचा साठाच जमा होईल की,.....आणि पुढलं वर्ष संपताना, हा आनंदाचा "ठेवा" मला आणखी समृद्ध करेल....
मात्र हा 'संकल्प' मोडू न देण्याचाही संकल्प करायला हवा !😀
--✍सुजाता.
Sunday, December 11, 2016
नव वर्ष
Thursday, December 1, 2016
गोड़ बोलणे
"गोड़ बोलणे"
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्
न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।
नासत्यं च प्रियं ब्रूयात्
एष धर्मः सनातनः ॥
खरं बोलावं, गोड़ बोलावं...
कटू सत्य बोलून कशास कुणा दुखवावं ?
आणि खोटं कितीही गोड़ वाटलं,
तरीही ते न बोलावं .....।।
गोड़ बोलण्याने इतरांना सुख मिळते. चार गोड शब्द बोलायला पैसे पडत नाहीत, तरीही माणूस एकमेकांशी बोलताना गोड बोलत नाही. हृदयात जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, माया, ममता, असेल,
तर सहजपणे आपण गोड़ बोलतो. इतरांना समाधान देण्याचे सामर्थ्य करोडो रुपयांच्या आर्थिक ताकदीतही नाही. ती ताकद चार गोड शब्दात मात्र खचाखच भरलेली असते.
बोलण्यामध्येही निर्हेतुक प्रेम असेल,बोलणं हे हळू, नम्रस्वरात, साधं, सहज, आपुलकीचं, आणि प्रसन्न
असेल, तरच ते सहजसुंदर 'गोड़' बनते. अशी माणसं सर्वांची आवडती होतात, सर्वांना हवीहवीशी वाटतात.
पोटी स्वार्थ ठेवून 'गोड़' बोलणारे लोकही जगात भेटतात. आपलं काम साधून घेण्यापुरते काही लोक प्रेमाने वागतात. तसं नसावं. ते 'कृत्रिम, व 'दिखाव्याचे' गोड़ बोलणे झाले. अशी 'नाटकी' गोड़ माणसं कालांतराने आवड़ेनाशी होतात.
आपले बोलणे अगदी गोड असावं याचा अर्थ नेहमी स्तुतिपरच बोलावं असे नाही. एखाद्याकडून खरंच काही चूक झाली असेल तर त्याला चारचौघात न बोलता स्वतंत्रपणे एकांतात, विश्वासात घेऊन शांतपणे समजावून सांगावं , हेही एक प्रकारचं गोड बोलणंच आहे.
गोड़ बोलणं, ही एक कला आहे, इतर सर्व कलांसारखीच तीही जन्मजात असते, आणि 'रियाज' करून ती जोपासावी लागते !
गोड बोलल्यावर लगेच डायबेटीस होत नाही तसेच डायबेटीस ऑलरेडी असेल तरी गोड खायला बंदी असते बोलायला नाही हे ठाऊक असूनही माणसे गोड बोलायला कचरतात.
गोड बोलणे हे, "आभासी" ( whats appवर, फेसबुकवर ) नेहमीच सोपं असतं....! व्यक्ती आणि तिच्यामुळे निर्माण होणार्या समस्या आपल्यासमोर आल्यावरही आपल्या मुखातून गोड शब्द बाहेर येणे हा संस्कार रक्तात भिनवणे तशी साधी गोष्ट नाही. यासाठी जिभेला वळण लावण्याचीही एक तपश्चर्याच करायला हवी !
-- ✍सुजाता मोघे. शिवाजी पार्क, मुंबई.
( 9821223939 )
