Tuesday, December 19, 2023

काही सांगायचंय मला....

काही सांगायचंय,..... मला काही सांगायचंय.... काही सांगायचंय मला, तुला,... काही सांगायचंय !
काही शब्दांच्या पलीकडलं काही बोलायचं राहिलेलं,‌‌
काही घडायचं राहिलेलं, ....अन् काही घडून गेलेलं
काही सांगायचय मला, .....तुला, काही सांगायचंय !
काही तुला न समजलेलं,.....
 काही समजायच्या पलीकडलं....
काही मलाच नीट उमगलेलं..... काही सांगायचंय !
 पण आता मला जाणवतंय, 
कदाचित तुला ते समजतंय...हळुवारपणे उलगडतंय
कोंदटलेलं उघडतंय,...... अंधारलेलं उजाडतंय....
एक हलकंसं स्मित उमटतंय, धुकं जसंकाही विरतंय,
आता कशाला काही सांगायचं..... 
कशाला उगीच बोलायचं.....
आता मनीचं गूज ऐकायचं, मनाचं गूढ उलघडायचं..
कशाला उगीच बोलायचं.....
आता कशाला काही सांगायचं.....
✍️ सुजाता

Thursday, December 7, 2023

अंधार

हे बरे झाले, देवा, 
दिला अंधार तू इतका मला....
वाट माझी शोधावया, 
झालो मी स्वतः दिवा...!
काटेरी वाटेवरूनी मी, 
चाललो एकटा असा....
स्वतःच बनलो ऊर्जा, 
अन् झालो मी माझा सखा !
हे बरे झाले, देवा,
 दिला अंधार तू इतका मला....
एक ठिणगी आंत माझ्या, 
लागली उजळायला !
या प्रवासाची दिशा, 
आता नको बदलायला,
जन्म जावा लागतो 
ही सार्थता समजायला.
नाकारले जाण्यातला 
दर्द ज्याने ओळखला,
रिते होण्यातला आनंदही  
त्यालाचच हो, उमगला !
प्रेमातही अन् द्वेषातही, 
माझा जीव होता अडकला,
मीच केले मोकळे, 
त्यांना ही, आणि स्वतः ला !
✍ सुजाता