Tuesday, December 19, 2023

काही सांगायचंय मला....

काही सांगायचंय,..... मला काही सांगायचंय.... काही सांगायचंय मला, तुला,... काही सांगायचंय !
काही शब्दांच्या पलीकडलं काही बोलायचं राहिलेलं,‌‌
काही घडायचं राहिलेलं, ....अन् काही घडून गेलेलं
काही सांगायचय मला, .....तुला, काही सांगायचंय !
काही तुला न समजलेलं,.....
 काही समजायच्या पलीकडलं....
काही मलाच नीट उमगलेलं..... काही सांगायचंय !
 पण आता मला जाणवतंय, 
कदाचित तुला ते समजतंय...हळुवारपणे उलगडतंय
कोंदटलेलं उघडतंय,...... अंधारलेलं उजाडतंय....
एक हलकंसं स्मित उमटतंय, धुकं जसंकाही विरतंय,
आता कशाला काही सांगायचं..... 
कशाला उगीच बोलायचं.....
आता मनीचं गूज ऐकायचं, मनाचं गूढ उलघडायचं..
कशाला उगीच बोलायचं.....
आता कशाला काही सांगायचं.....
✍️ सुजाता

Thursday, December 7, 2023

अंधार

हे बरे झाले, देवा, 
दिला अंधार तू इतका मला....
वाट माझी शोधावया, 
झालो मी स्वतः दिवा...!
काटेरी वाटेवरूनी मी, 
चाललो एकटा असा....
स्वतःच बनलो ऊर्जा, 
अन् झालो मी माझा सखा !
हे बरे झाले, देवा,
 दिला अंधार तू इतका मला....
एक ठिणगी आंत माझ्या, 
लागली उजळायला !
या प्रवासाची दिशा, 
आता नको बदलायला,
जन्म जावा लागतो 
ही सार्थता समजायला.
नाकारले जाण्यातला 
दर्द ज्याने ओळखला,
रिते होण्यातला आनंदही  
त्यालाचच हो, उमगला !
प्रेमातही अन् द्वेषातही, 
माझा जीव होता अडकला,
मीच केले मोकळे, 
त्यांना ही, आणि स्वतः ला !
✍ सुजाता

Tuesday, November 14, 2023

दिवा

दिव्याच्या वाती सारखं आयुष्य जगावं .....
दिव्याची वात तेलामध्ये आकंठ बुडालेली असते,
पण तिचं टोक मात्र तेलाबाहेरच असतं,
त्यामुळेच तर ती पेटते, उजेड देते ....... 
तेलात पूर्णपणे बुडालेली वात कशी बरं प्रकाश देईल ?
मला वाटतं आपणही तसंच जगावं.....
बाहेरच्या जगात कितीही गुंतलो,
तरी मनातून मात्र थोडं अलिप्तच असावं.
मग बघा आपलं आयुष्य कसं उजळेल..... आणि 
आपण इतरांची आयुष्यही उजळवून टाकू..
एक दिवा स्नेहाचा, आपल्या हृदयात,....
एक दिवा सहानुभूतीचा - इतरांबद्दलच्या..
एक दिवा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा....
एक दिवा कृतज्ञतेचा.... 
✍️ सुजाता

Sunday, November 12, 2023

पालखीचे भोई

कितीही मिळालं तरी, कधी पुरेसं होतं नाही....
अजून हवं अजून हवं, हांव काही संपत नाही.
हवं ते मिळालं, तर कधी संपेल, समजत नाही,
कितीही जपून ठेवलं, तरी भय काही सरत नाही.
क्रोध जाता जात नाही, मत्सर कमी होत नाही,
कित्ती विचार केला तरी विवेक काही येत नाही.
मनाला दाबून ठेवलं तरी उसळी मारतच राही,
कंट्रोल केलं, तरी आवाक्यात रहात नाही !
काय केलं, तर वासना संपतील, 
काही केल्या उमगत नाही.....
मनःशांती कशी मिळेल, हे काही कळत नाही !
अंतरात्म्यास विचारून पाही,
तूच उपाय सुचव काही.....
भक्तिमार्गावर पाऊल ठेवता, कोलाहल शांत होई
"करविता" कळताच, "कर्ता भाव" गळत जाई..
'मी' 'मी' चे तुणतुणे आता फारसे वाजत नाही,
उमगते आपल्याला, आपण तर पालखीचे भोई,
               आपण तर पालखीचे भोई .....!!
✍️ सुजाता 

Sunday, November 5, 2023

Mibile

मोबाईल प्रमाणेच, आपल्या मनावरही
मधूनमधून Antivirus फिरवावा,
आपलं Mind Cool करावं ....
नको असलेल्या, निराशाजनक
 Junk Files Clear कराव्यात,
द्वेशाचे, मत्सराचे Caches Clean करावेत.
म्हणजे मग बघा, आयुष्य कसं Boost होईल...
✍️ सुजाता 😃

Sunday, October 22, 2023

कृष्णसखा

एकेकाचा कृष्णसखा, प्रत्येकाला भेटतो ....
खोल खोल आत मनाच्या, तोच राहात असतो.
 बुद्धी तेथे थांबते, अन विचारही संपतो,
ज्याचा त्याचा कृष्णसखा ज्याला त्याला लाभतो !
मी न  शरीर माझे, अहंकारही हा संपतो....
 ज्याचा त्याचा कृष्ण सारथी, योग्यवेळी भेटतो !
मी कधीच बद्ध नव्हतो, हे उमगते त्या क्षणी, 
 कृष्णसखा ज्याक्षणी अंतर्यामी गवसतो.....!!
✍️ सुजाता.

Thursday, August 31, 2023

मोर

लच्छीचा मोर कधी अंगणात येऊन नाचणार नाही, लच्छीलाच नाचायला हवं, 
मोराला बोलवण्यासाठी !
मोर आपल्या आंत आंत भिनायला हवा.....!!
माझ्या बाजूची हिरवळ 
मीच फुलवायला हवी,....
माझा अंधार मीच दूर करायला हवा....!
जगण्याचा ताल अन् लय जपायला हवी....!!
✍️ सुजाता 

Saturday, August 12, 2023

मुक्त

जनीचे कांडिले दळण,
राधेस पुरवी बांसुरीचे सूर....
मीरेच्या प्याल्यातील विष 
केलेस निष्प्रभ,
द्रौपदीची राखिली लाज, 
पुरवूनी वस्त्र,
अर्जुनाला उचलायला 
लाविलेस शस्त्र !
ज्याचा त्याचा कृष्ण, 
ज्याचा तो जाणितो भक्त....
सखा बनूनी माझा, 
तू होसी व्यक्त,
श्रीहरि, तूच रे, 
मज करिसी मुक्त....!!
✍️ सुजाता 🙏💕

हरि माझा

जिथे तिथे मला भेटे, 
हरि माझा सावळा,.....
अवघे जगणे बनले एक, 
नयनरम्य सोहळा !
उठता बसता ऐकू येतो, 
मला माझा अंतर्नाद,....
देवाशी माझा आता, 
चालू असतो संवाद !
ऐसे नाही, की दुःख नाही, 
होत नाहीत वेदना,
परंतु आता उरल्या नाहीत, 
छोट्या छोट्या वासना.
हेवा नाही, द्वेश नाही, 
ना कुणाविषयी दुस्वास,
पाॅझिटिव्हिटी श्वास माझा, 
निगेटिव्हीटी उच्छवास !
✍  Sujata Moghe

Thursday, August 10, 2023

लेक

आजही ते सारे माझ्या डोळ्यांसमोर येते,
पैंजणांचा आवाज करीत तू दुडू दुडू धावते....
आत्ता होतीस खेळत, आता कशी शाळेत जाते, 
बघता बघता कॉलेज- मेडिसिन चा अभ्यास करते.
PPE Kit घालून ड्युटी करता करता,
सरळ बोहल्यावरच चढते.....!
सगळ्यांची लाडकी, छोटीशी बाहुली,
लंडनमध्ये जबाबदारीने स्थायिक होते...?!
आसुसलेली माझी नजर तुझी वाट पाहते,
बाळंतपणासाठी कधी एकदा तू घरी येते....!
आता मात्र आईचं हृदय माझं, कृतकृत्य होते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते....
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.... !!
✍️ सुजाता 🙂💞

Wednesday, August 9, 2023

who am i ??

When I was in my mother's womb, 
how did I feel .....?
I was so happy,... and relaxed !
I didn't have to go and eat.....
 walk and do work....
 no talking to anybody,
 as there wasn't anyone, out there !
I had my MOM to take care of me,
To feed me, talk to me....and
Assured my Safety and Wellbeing !
I was not worried about the 
Life after Birth.....!
But Now, I'm worried about
The Life after Death.....
Now, I can take and eat food myself,
Talk to my People and
 take care of myself....
I'm happy enjoying my life,....
Though sometimes I'm worried
And Stressed and Agitated
And Sad about my surroundings....
But, Now, there is GOD, 
To whom I can look upto, in Pain....
I can ask for His Blessings,
And He Takes care of me....!!
But now I'm worried about my Death
And  about the Life after Death !
But, thanks to the Scriptures 
and my Guru who teach me
That I'm  the  Atman,....
I need not worry  of  Death,
I'm One with GOD....!
The Atman will be Merged with Paramatma....!
No Worry, no Pain, no Agitation....
As I'm Sat -Chit- Aanand....!
I'm Blessed....!!
✍️ Sujata

Saturday, April 1, 2023

स्वातंत्र्य

काय असते हो ही 
'स्वातंत्र्य' नावाची भानगड....
लोकांना का वाटते
त्याची एवढी नङ....?
ते मिळतं,....की मिळवावं लागतं ?
ते असलं, तर काय मोठं होतं....?
आणि नसलं, तर काय मोठंसं अङतं ?
"मी तुला स्वातंत्र्य देतोय....."
हे वाक्यच किती 'फनी' वाटतं !
स्वातंत्र्य का कधी कुणी कुणाला द्यायचं असतं....?
ते तर आपल्याला जन्मतःच मिळालेलं असतं.....
देवानीसुद्धा आपल्याला 'कर्मस्वातंत्र्य' दिलेलं असतं.....
हां, पण 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार'
यातलं अंतर लक्षात ठेवायला लागतं !!
✍ सुजाता

आरसा

चेह-याप्रमाणे 'स्वभाव' दाखवणारा
'आरसा' कुठे मिळेल का ?
मत्सर - ईर्षा- राग यांचा 'पारा'
कुणी दाखवेल का ?
अंतरंगातली 'कुरूपता'
स्वतः ला तरी दिसेल का ?
करून 'पूजा अर्चा '
वागणं कधी सुधरेल का ?
तरी मला वाटतं, 'नाम' घेताघेता,
'मी'पणा थोडा 'गळेल' ना....??
✍सुजाता