माझ्या आयुष्यात किती पावसाळे आले ?
त्यापेक्षाही महत्त्वाचे , मी त्यात किती भिजले ?
किती विकारांच्या आधीन झाले ....?
किती विचारांना पाॅझिटिव्ह बनवले ...?
किती जणांना दुखवले...., दुरावले...
किती वेळा हर्ट झाले, तुटले, कोसळले...!
पण जर सावरले, सुधारले, परिपक्व झाले,
तरच खरी तुझ्या कृपा- वर्षावात न्हाऊन निघाले !
Tuesday, June 28, 2016
पावसाळे.....
Friday, June 24, 2016
कधी वाटतं....
️💭☔️
️कधी वाटतं पाऊस व्हावं....
आणि आवेगानं धरतीच्या कुशीत शिरावं,
हळुवारपणे फुलांवरती टपटपावं......
कधी वाटतं पाऊस व्हावं
शाळेतल्या मुलांच्या रेनकोटमधून
चिखलाच्या खड्ड्यात डान्स करावा....
आणि कुणा लाजाळू प्रेमिकांना
एकाच छत्रीत आडोसा घेण्याचा चान्स द्यावा
कधी वाटतं पाऊस व्हावं...
एखाद्या कातरवेळी कुणा विरहीणीच्या
डोळ्यांमधल्या अश्रूंमध्ये एकरूप व्हावं
कधी वाटतं पाऊस व्हावं
आणि आयुष्याच्या संध्याकाळी
पागोळ्यांमधून आयुष्याचा पट उलगडून बसावं !
-- सुजाता
$E₦Ŧ ₣ƦØM $UJλŦλ'$ łPλÐ
Thursday, June 23, 2016
माणसं .....
हल्ली पुस्तकं वाचणं सोडूनच दिलंय मी...
हल्ली माणसंच वाचत असते मी ...
काही काही, पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात,
समजून घ्यावीशी ......
काही नव्याने कळतात.
काही अगम्य, दुर्बोध,
अर्धवटच सोडून द्यावीशी....
पण किती प्रकार.... किती तऱ्हा...
काही सोपी, लघुकथेसारखी,
तर काही किचकट, नवकथेसारखी.
काही बोअरिंग... कादंबरीसारखी.
तर काही इंटरेस्टिंग, रहस्यकथेसारखी .
पण तरीही , हरएक, वेगवेगळी....!
काही पुस्तकं, - अहं - माणसं,
दुःखी करतात, तर काही, अंतर्मुख....!
आता , मला 'स्वतःलाच' वाचलं पाहिजे एकदा,
चष्मा माझा साफ करून घेतला पाहिजे एकदा ...!!
--सुजाता.
Wednesday, June 22, 2016
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचा पाऊस
"आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचा पाऊस "
बालपणी पाऊस येतो,
होड्या घेऊन अंगणात.....
शाळेला सुट्टी, मैत्रिणींशी मस्ती,
वेळ जातो एकमेकांना भिजवण्यात !
तरुणपणी पाऊस येतो,
हुरहुर घेऊन मनांत.....
स्वप्नातल्या राजकुमाराबरोबर
भिजवतो एका छत्रीत !
लग्न झाल्यावर पाऊस आणतो
आजारपणाची भिती,
मुलांसाठी Vicks, ह्यांच्यासाठी भजी,
ह्यातच वेळ जातो किती !
प्रौढपणी पाऊस म्हणजे
गाड्या बंद, आणि धास्ती.....
मुलं, सुना, नातवंड उशीरा येती, लाईट्सही जाती !
पण .... लागता नेत्र पैलतीरी,
हाच पाऊस आणतो 'त्याची' कृपादृष्टी .....
त्याच्या कृपेच्या वर्षावात न्हाऊन घ्यावं,
आता कशाला कुणाची भिती ?!!
-- सुजाता
Sent from Sujata's iPhone
Tuesday, June 21, 2016
पाऊस
गड़गड़ाटाचा ढोल वाजवीत आला, .....
मनमोराचा पिसारा फुलवीत आला .....
धरित्रीची तृष्णा शमवीत आला ....
बळीराजाच्या आशा फुलवीत आला !!
Monday, June 20, 2016
पाऊस.....
तू, मी, अन् पाऊस ...
खूप वाट पाहिली, आता नकोच जाऊस .....
भिजूदे तन-मनाला, छत्री नको घेऊस....
तृप्त कर मला, जगाला नको भिऊस...!
तू , मी , अन् पाऊस ....!!
इंद्रधनू. ....
धरणीला भिडतो पाऊस, तेव्हा
आकाशातच राहतं ' इंद्रधनू '.....
पण, न रुसता, घेऊन त्याची
' रंग ऊधळण्याची जादू,
स्वतःतूनच रंग-गंध अन् आकार फुलवून,
बहरते तिची तनू .....!!
Monday, June 13, 2016
कान्हा......
"तुझ्याशिवाय रंगांनाही 'रंग ' नाही कान्हा ......."
आयुष्य झाले रंगहीन, तू रंग भराया ये ना.....
आतातरी संपव हा विरह जीवघेणा....
नको ना रे छळू असा तू पुन्हा पुन्हा.....
तेरे बिना, खुशबू नहीं फुलोंको,
खूबसूरती नहीं तारोंको,
खुमार नहीं रंगोंको, कान्हा,
जिंदगी बेरंग है, तुम रंग जमाने आना...।
आई .....
प्रेममयी, वात्सल्यरूप,त्यागमूर्ती आई....
कधी तिच्या भावना कोणी समजून घेई ?
गृहीत धरून तिला जो तो विसरून जाई. ...
तुझे तूच आता स्थान निर्माण कर ग बाई !!
मला काय हवंय
✔शाळेतून काढताना , लग्न करून टाकताना
आईवडिलांनी नाही विचारलं"मला काय हवंय"
करिअर सोडताना, संसारात रमताना
नव-यानी नाही जाणून घेतलं"मला काय हवंय"
मुलबाळांचं करताना, स्वतःची हौस मारताना
मी स्वतःच विसरले "मला काय हवंय "......
आता,आयुष्य संपताना,छोटेछोटे आनंद घेताना
माझं मलाच उमगलं , " मला काय हवंय " !!
Sunday, June 12, 2016
माझं मन ....
भरुन आलंय माझं मन....,
आभाळासारखंच !
धो धो रडण्यानी
मोकळं होईल ते ही,
पसरेल त्यावर
समाधानाचे ऊन्हं
आणि उमटेल स्मिताचं इंद्रधनू !
मग वाईट कसं रडणं ?
ते तर गरजेचंच,
माझ्या मनाच्या मशागतीसाठी !!
Saturday, June 11, 2016
मैत्री.....
मैत्रीचं नाव काय ठेवू ?
'स्वप्न' ठेवलं तर अपूर्ण राहील..
'मन' ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की 'श्वास' ठेवू
म्हणजे मरेपर्यंत 'सोबत' राहील..
इस दोस्ती को क्या नाम दूं.....
" ख्वाब" रखूं, तो अधुरी रहेगी....
"दिल" रखूं , तो टूट जाएगी....
फिर सोचा "सांस" रखूं ....
आखरी दमतक साथ तो रहेगी...।
जखम
जखम झाली तनूला तर येते लवकर भरून,पण
जखम झाली मनाला तर भरून येणे कठीण ।
शरीराच्या जखमेवरचे औषध असते मोठे,
पण मनावरच्या जखमेवर औषध मिळते कुठे ?
-- सुजाता
Friday, June 10, 2016
💦पाऊस 💦
💦नव्या घरातला पहिला पाऊस ....
Temporary घर, पण 'चिरतरुण' पाऊस.
खूप वाट बघीतली...आता लौकर नको जाऊस...
'समृद्ध ' कर धरणीला, आता भाव नको खाऊस !
-सुजाता.
दुःख
दुःख म्हणजे काय. ....
सुखाचा अभाव. ....
की वेदनेचा अनुभव ?
मनाचा स्थायीभाव,
की आनंदाचा आविर्भाव. ..!?
नाती बदलत जाती .....
️नाती बदलत जाती ...
जी सतत बदलतात ना , ती नाती ....
ऋतू बदलतात , Callander वरची पानेही बदलतात ,
मग नाती बदलली तर एवढी खळखळ कशाला ?
ऋणानुबंधाच्या गांठी ,
कधी नव्याने जुळतात , कधी बांधलेल्या सुटतात ,
तर कधी जुन्याच नात्यांचे पीळ बदलतात....
नातीच ना ती , बदलणारच !
रस्तासुद्धा सरळसोट असला तर एकसूरी होऊन जातो ,
थोडी वळणं , थोडे चढउतार वाटचाल सुसह्य करतात
नदीसारखी , नातीही वळणं घेत , चढ़त उतरत ,
पुढेपुढे सरकावी लागतात ....
नाहीतर ती काँचतात , कुजतात
धागे उभे आडवे , काही घट्ट काही पीळदार ,
काही सैलसर , space देणारे ,
आयुष्याचं वस्त्र जरतारी करतात !
- - सुजाता
$E₦Ŧ ₣ƦØM $UJλŦλ'$ łPλÐ
मोती .....
अश्कों के मोती युं ना बहाईए,
अपनी भावनाओंको युं ना छुपाईए,
ना मिले ममता किसी एकसे तो क्या हुवा....
जो देते हैं खुशी, उन्हें तो अपनाईए....।
जीवनगाणे .....
माझे आता काही नाही तुझ्याकडे मागणे
पेरले तसे उगवणे हेतर सृष्टीचेच देणे ।
'भोगणे' किंवा 'उपभोगणे'....
दोन्ही आनंदाने स्वीकारणे,
हेच खरे " जीवनगाणे".....!
हेच खरे "जीवनगाणे ".....!!
Thursday, June 9, 2016
परीक्षा.....
आयुष्यात संकटं घेतात आपली परीक्षा,
त्यांना भिऊन का करावी स्वतःलाच शिक्षा
इतरांकडून करू नये कसलीच अपेक्षा ....
आनंदात-मजेत, मस्तीत जगावं त्यापेक्षा !!
अद्वैत......
🌹मी मिटता लोचन तुझीच मूर्ती दिसते....
मी पहाता दर्पण, तुझी छबी न्याहळते.
ही प्रीत म्हणू की अद्वैत म्हणावे नकळे...
जणू दोन तनू पण,आत्मे एकरूप झाले..
प्रेम.....
प्रेम ......
धबधब्यासारखं अंगावर कोसळणारं. ....
कधी नदीसारखं शांत वाहणारं.
वादळासारखं घोंघावणारं,
तर कधी झुळूकीसारखं गुणगुणारं. ....
मनातून उमलणारं. ...
जगापासून लपणारं. ....
कुठवर माझ्याबरोबर येशील असं विचारताच
निष्पापपणे हसणारं. ....
तू कुठवर जाऊ शकशील
असं मलाच विचारणारं.....
निरागस, अढळ, अश्राप प्रेम. ....!
माझी सखी
आहे माझीही एक सखी, जिवलग अशी. ..
नाटक-सिनेमा-पुस्तक वाचतांनाही ती मला वाटते हवीहवीशी. ..
जिच्यावाचून कामे उरकते मी उदास,कशीबशी ...
अशी माझी जिवलग सखी,
ती माझी "चाळीशी "(चष्मा ) !!
😊😃😁😜
तृप्त !
हे स्वप्न म्हणू, सत्य की आभास....
तुझं अस्तित्व सतत माझ्या आसपास....
फुलातून अलग करता येईल का
कधी सुवास....
तृप्त आहे मी, आता कसलीच उरली नाही आंस !
( हे प्रियकरालाही लागू पडतं.....
अन् परमेश्वरालाही.....)
Wednesday, June 8, 2016
रखुमाई.....
मी वामांगी .....
28 युगं मीही उभी...एकाकी....
जवळ असूनही....दूर कितीतरी.....
डोळ्यांवर झापड लेऊन. ....सवईने ।
जणू फसवतेय इतरांना .....की स्वतःलाच !
युगानुयुगांची साथ असल्याचा 'भास'.
अंगावर येतो माझा सनातन एकटेपणा. ....
चौथ्या कम-यानेही भरून न येणारा..!!
निवृत्ती
"निवृत्ती ".....नव्हे, आयुष्याची नवी आवृत्ती !
दिवस गेले, वर्षं गेली, अखेर आली निवृत्ती ,
आनंदामध्ये जगा आता, बदला आपली वृत्ती।
लवकर उठणे विसरा आता, खुशाल ताणून द्या,
'बेड टी'ची लज्ज्त न्यारी, एकदा चाखून घ्या।
चवीचवीने वाचा पेपर, वरवर फिरवून दृष्टी
मापे काढा कॉंग्रेसची अन् मोदींची खरडपट्टी।
टीव्ही पहात चाखा नाश्ता, रोज़ नवीन डीश,
नित्य नव्या रेसिपींसाठी, सैल सोडा जीभ !
ऑफिसची ना घाई आता, रोजरोजची सुट्टी,
निवांत आंघोळ निवांत जीवन, करा मनाची पुष्टी ।
सावकाशीने करा भोजन, मारा आडवा हात,
पुरणपोळी,कधी बिर्याणी,कधी साखरभात ।
वामकुक्षीला नका नाकारु,करा तिच्याशी गट्टी !
सायंकाळी,निवांत वेळी, आळस झटकून टाका,
पाणीपुरीच्या अन् मिसळीच्या दुर्लक्षू नका हांका !
चक्कर मारा बागेमध्ये, करा मोकळे पाय,
कट्यावरती रंगवा गप्पा, किंवा 'हॅलो' 'हाय' !
राहून गेलेला सिनेमा किंवा, नवे एखादे नाटक.....
किंवा नुसते लोळता लोळता वाचा एखादे पुस्तक !
सुगृहिणी-आई-प्रेमळ आज्जी, नव्या नव्या भूमिका,
इतरांसाठी कष्टलात आजवर, आता स्वत:साठीही जगा !
चित्र हे 'संध्या-संसाराचे', करा तुम्हीच रंगीन.....
निवृत्तीचे क्षण सुखाचे, खेळा " सेकंड इनिंग" !!
------सुजाता
चौथा कमरा ...
स्त्रीलाच काय, प्रत्येक व्यक्तीला हवा एक "चौथा कमरा ".....
मग ती स्टडी रूम असो वा बागेतला कोपरा.....
शांत बसण्यासाठी, 'अभिव्यक्त' होण्यासाठी, स्वतःची "स्पेस " जपणारा......
नाहीतर माणूस स्वतःच्याच घरात होईल "उपरा".....!!
आयुष्य
आनंदी रहाण्याची सुरवात कुठच्याही दिवसापासून करता येते,
फक्त तुम्हाला 'जाग' यावी लागते ......
आणि तुमच्यात ती 'आग' असावी लागते. ...
लोकांच्या तक्रारींचं आणि अपेक्षांचं ओझं
झुगारून देण्याची हिंमत असावी लागते !
एकदा का ते झुगारून दिलं, की आपण
पिसासारखे हलके होतो...
आणि स्वतःतच रमतो !
मग आयुष्य खूप सुंदर होत जातं.....
Tuesday, June 7, 2016
️प्रेम म्हणजे काय असतं.....
प्रेम म्हणजे काय असतं,
म्हटलं तर काहीच नसतं,
मानलं तर सर्वस्व असतं !
प्रेम म्हणजे कळवळून घातलेली साद,
नकळत आलेला प्रतिसाद,
आर्ततेने मारलेली हांक,
मनापासून दिलेली दाद ।
प्रेम म्हणजे काळोखात धरलेला हात,
शेवटपर्यंत दिलेला साथ,
मुद्दाम दाखवलेला राग,
आणि न सांगता केलेला त्याग !
प्रेम म्हणजे पांवसात चिंब भिजणं,
आणि एकांतात एकटीनेच रडणं ।
प्रेम म्हणजे भर दुपारी कानावर आलेलं गाणं,
आणि मग डोळे मिटून स्वप्नांमध्येच रमणं !
प्रेम म्हणजे क्षणिक रुसवा फुगवा,
आणि " माझे लाड पुरवा " !
प्रेम म्हणजे नव्हेत 'एकाच्या'च अटी....
आणि महागड्या भेटी !
प्रेम म्हणजे थरथरत्या हातांनी एकमेकांना सावरणं
परस्परांच्या आधारानी एकमेकांसाठी जगणं !
प्रेम म्हणजे मानलं तर सर्वस्व असतं
आणि हसलं तर काहीच नसतं !!
--सुजाता.
प्यार.....
मैं आपका प्यार पाती, तो कोई जलता.....
मैं आपकी तस्वीर पाती, तो कोई छीनता....
पर मैंने आपकी यादें पायी हैं,
जो कोई छीन तो क्या, देखभी नहीं सकता ।
Hello , पुलं .....
Hello...पुलं....
"भाई" म्हणण्याईतकी आपली जवळीक नाही.
तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची माझी इच्छा पूर्ण झाली नाही.
" नमस्कार करण्याजोगी माणसं कमी उरलीत " असं तुम्ही म्हणालात, तेव्हाच तुम्हाला वाकून नमस्कार करायला हवा होता.
पण ती ईच्छा आज प्रभादेवीला चक्क "पु. ल. देशपांडे कला अकादमी"च्या समोर 'रहायला' आल्यावर पूर्ण झाली !
आता रोज खिडकीतून तुमच्या 'नावाचं' दर्शन घेते आणि तुम्हाला 'गुरूतुल्य ' असणाऱ्या "रविन्द्र " नाट्यमंदिराच्या आवारात रोज फिरते,....तेव्हा
खूप छान वाटतं....!! तिथे होणारा कार्यक्रम
चुकवत नाही.
आता, " स्वर्गात " तरी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटायचंय् ..!!
----सुजाता .
आठवणी .....
आठवणींचं मोहोळ ऊठलं,....
कित्येक प्रसंग डसले मनाला ....
पण शेवटी, गोड मधाचा साठा मिळाला,
आयुष्यभराची बेगमी झाली....!
यादें .....
तुमसे तो अच्छी तुम्हारी "यादें" हैं....
जो मेरे बुलाते ही आतीं हैं,....
और मेरे चाहनेतक 'रुकती' हैं ।
तुम्हारे तरह कभी छोड़कर नहीं जाती है ।
विश्वास
तू माझ्या पाठीशी आहेस सतत
हा माझा विश्वास आहे...
तुझं नामस्मरण, हा माझा श्वास आहे.
तुझे अस्तित्व सदा माझ्या आसपास आहे,
हा भास नाही, जणू दरवळणारा सुवास आहे !
हर मुसीबत में तुम मेरे साथ हो,
ये मेरा विश्वास है ।
तुम्हारे नाम की माला जपना,
ये मेरा श्वास है ।
मैत्रीचे सोनपंखी दिवस !
आम्ही सगळे विलेपार्ल्याच्या M.L.Dahanukar कॉलेजचे विद्यार्थी ! 1984 मध्ये B. Com. झाल्यावर विखुरले गेलो होतो...जवळ जवळ 30 - 31 वर्षं आमच्यात काहीच communication नव्हतं. पण, आमचा Admin अभय देव याने ठरवलं, की आपला Whatsapp ग्रुप तरी स्थापन करायचा....राजू वाघ आणि माधवी कुलकर्णी यांनी सगळ्यांचे फोन नंबर्स मिळवले, आणि आम्ही प्रथम मे 2015 मध्ये भेटलो !
30 -31 वर्षांनंतर, कॉलेजच्या "मुलामुलींशी " बोलताना खूप बरं वाटलं...माझं नुकतंच गुडघ्याचं operation झालं असल्यामुळे मी फक्त 'Walker' आणि 'Internet' वर होते. अशावेळी, संसारात पूर्णपणे बुडून गेलेले असताना, कॉलेजचे 'सोनपंखी' दिवस अनुभवायला मिळणे, ही सुवर्णसंधीच होती !
6-7 महिने नुसतेच chatting आणि फोनवर बोलून आमची तहान भागली नाही, तेव्हा आम्ही पिकनिकची तयारी केली आणि चक्क
" जांभूळपाड़ा" आणि "लोणावळ्याला " जाऊनही आलो...आधी 10, मग 20 असं करत करत आता आम्ही 40 जणांचं Get-together ही केलं.
तरी एकूण 73 जणांचा ग्रूप आहे,....बाकीच्यांनाही आमच्या 'आनंदयात्रेत' सामील करायचं आहे.
आम्ही पाठवलेले फोटो बघून एक एक
'मुलगा-मुलगी' (!) सहभागी होत गेले....
राजू वाघ-महेश वाडेकर सारखे गायक,
संजय कुशे - अभय मेहता सारखे आयोजक, विजय ताळगावकर म्हणजे आमचा चालता बोलता encyclopedia च !
माधवी आमची Treasurer ! किरण पैंगणकर आणि अजित साटम यांचा 'हजरजबाबीपणा' .... कुणाच्या कविता... आणि
वय विसरून 'थिरकायला' लावणारी गाणी...
या 'गेट-टुगेदर' मुळे आम्हाला प्रत्येकाला आपल्यातलं Hidden Talent गवसलं....
मधली 30 वर्षे जणू काळाच्या ऊदरात गुड़ूप झाली... आमही चक्क 20-21 वर्षांचे तरूण झालो आणि आम्ही पुन्हा "काॅलेजियन्स" बनलो.... जुन्या मित्र- मैत्रिणींशी नव्याने मैत्री जुळली, तीही घट्ट !
आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना, आणि संसाराच्या, करियरच्या " Peak " वर असताना, काॅलेजमधल्या मुलांसारखी धम्माल करतो आहोत. आताच्या आमच्या दिवसांचं वर्णन मी तीनच शब्दांत करेन __ Relaxing,
Refreshing, &
Rejuvenating !!!
-- सुजाता मोघे,
शिवाजी पार्क, दादर.
माझी पिल्लं
माझी पिल्लं.....
माझी पिल्लं घरी होती तेव्हा,....
घरभर पसारा ,....
पुस्तकं-पेनं- सेंटस्-शूज-बॅगज्.....
मला आवरण्यासाठी .
मी ओरडायची,
दारं नीट लावा,....Responsible व्हा !
आता पिल्लं उडाली भुर्र....
घर माझं लख्ख,...आवरलेलं.....
त्यांच्यामागे दार .... घट्ट लावलेलं ...!
आता मी घेते सुवास ,
त्यांनी संपवलेल्या सेंटचा,
भरून माझ्या रित्या ह्रदयाच्या पोकळीत .....!
पण आयुष्य असंच असतं ना ,
वाहतं ..... नदीसारखं ....?
आता पिल्लं बनलीत Responsible,
त्यांच्या घरट्यासाठी ,....त्यांच्या पिल्लांसाठी.
आयुष्य असंच असावं ना,....
वाहतं ,..... नदीसारखं ......!!
---सुजाता.
Sunday, June 5, 2016
Thursday, June 2, 2016
माझी कविता.....
माझी कविता....
मन रिझवते, मज खुलविते,
मी उदास दिसता,
साथ देते , कानी गुणगुणते,
मी एकाकी असतां.
ध्यानी वसते, स्वप्नी दिसते,
येता जाता...
अशी माझी जिवलग सखी,
ती माझी कविता,
ती माझी कविता....!!!
आरसा
मन आणि आरसा....!
मन असावं आरशासारखं 'नितळ' ,
ज्यात दिसेल समोरच्याचं प्रतिबिंब स्वच्छ !
मनानं दाखवावं....
आणि स्विकारावं 'वास्तव ',
जसं असेल तसं ...!
नसावं मन "धूसर"....
"पूर्वग्रहांनी " आच्छादलेलं...
किंवा "नैराश्यातून " झाकोळलेलं.
मन असावं आरशासारखं लख्ख, "चमकदार"....प्रसन्न .....
" Positive" विचारांनी बहरलेलं...!!
संवाद
आता होत नाहीत आपल्या दोघांत वाद,
कारण उरलाच नाही आपल्यात ' संवाद '
तू कधीच देत नाहीस मला दाद....
आणि मीही घालत नाही आताशा तुला 'साद' !
Wednesday, June 1, 2016
विशाल परुळेकर
अनाथांचा मायबाप आधार..
Leave a reply
मुंबईच्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरीतील नदी काठची एक खोली. अगदी काल परवापर्यंत या खोलीला छप्पर नव्हतं. भिंतीही ढासळलेल्या होत्या. पण कोणातरी सुहृदानं पत्रे पुरवले आणि त्या पडीक वास्तूला घराचं रूप आलं. भिंतीला गिलावाही नाही, रंग तर दूरचीच गोष्ट पण जमीन मात्र शेणानं छानशी सारवलेली. खोलीच्या बाहेर स्वयंपाकघर.. म्हणजे त्या खोलीच्या बाहेर भिंतीशी चूल, थोडीशी भांडी आणि ऊन पावसापासून बचावासाठी वर ताडपत्री, तीन बाजूंना भिंती नाहीतच. एवढया टळटळीत उन्हात थोडासा गारवा देणारा, कोणीतरी दिलेलाच एक कव्हर नसलेला छोटासा टेबल फ़ॅन. ही जागा पछाडलेली असा समज असल्यामुळे बेवारशी पडली होती. पण आता तिथे राहतो विशाल परुळेकर, त्याची बायको अंकिता आणि त्यांची 48 मुलं. हो त्याचीच मुलं. कारण या मुलांसाठी तोच एक मायबाप आधार आहे. २४ मुली, २४ मुलं. वय वर्ष ४ ते १६. काही विदर्भ मराठवाड्यातली तर काही जव्हार, मोखाडा, तलासरी या आदिवासी पट्यातली.
विशालची आई तो दीड वर्षाचा असतानाच वारली, वडील व्यसनाधीन त्यामुळे हलाखी, खाण्यापिण्याची, शिक्षणाची आबाळ, जगण्यासाठीची धडपड त्याने अनुभवली आणि आपल्या सारखं जीणं जगणाऱ्यांचा तो मायबाप आधार झाला. त्यांचं फक्त जेवणखाणच तो करत नाही, तर त्यांना शिकवतो आहे, त्यांना घडवतो आहे.
कायम शिव्याच तोंडात असलेली ही मुलं आता श्लोक म्हणतात. या मुलांसाठी काहीना काही घेऊन आलेले पाहुणे हे देवासारखे आहेत असं विशाल त्यांना समजावतो आणि मग मुलं समोर डोळे मिटून, हात जोडून बसतात आणि ‘मला हे दत्तगुरु दिसले’ हे गाणं म्हणतात.
तिथे सकाळी ९ च्या आत आलेल्या पाहुण्यांना कोरा चहा (कारण दूध उशीरा येतं) रानमेवा दिला जातो, पोह्याचा आग्रह होतो. मुलांना दूध देणं शक्य नाही म्हणून विशाल कोरा चहाच पितो.
विशाल या मुलांसाठी कपडे, धान्य, कडधान्य, वह्या, पुस्तकं जमा करून आणतो. मग हेच कपडे धूऊन, इस्त्री करून, नव्याचं रूप देऊन त्या मुलांना सणासुदीला भेट करतो. तो आणि अंकिताही असेच जुने कपडे वापरतात. घरात किती अन्नधान्य आहे याकडे मोठ्या मुलांचं लक्ष असतं. मुलं इतकी समजूतदार आहेत की घरातला धान्याचा साठा कमी झाला की आपोआपच त्यांची भूकही कमी होते. तरीही अगदीच काही सोय झाली नाही तर नदी आहेच. मग कोणीतरी दिलेल्या मच्छरदाणीचा उपयोग, मासे पकडण्यासाठी करण्याची शक्कल मुलंच लढवितात आणि तो दिवस छान साजरा होतो.
आलेल्या पाहुण्यालाही विन्मुख पाठविलं जात नाही. मुलांनीच पिकविलेल्या कांद्याची माळ, झाडावरून काढलेला रानमेवा त्यांना भेट दिला जातो.
वडिलांच्या वसईतील प्रिंटिंग प्रेसला किंवा त्याची भागीदारी असलेल्या शिर्डीतील हॉटेलला काही व्यवसाय मिळवून दिला तर जे कमिशन मिळतं त्यावर मुख्यत्वे त्याचा उदरनिर्वाह चालतो.
विशाल SY BA पर्यंत शिकला. शिर्डीत मित्राच्या जोडीने त्याने हॉटेल व्यवसायही सुरु केला. व्यवसाय चांगला सुरु झाला, पैसे मिळू लागले, सुखाचे दिवस आले.
गोरेगावच्या डॉ. जगदीश सामंत यांच्या वालीव (वसई) इथल्या कुष्ठरोग्यांसाठीच्या संस्थेत विशालचे काका डॉ. विकास परुळेकर कार्यरत होते. तिथे त्याने काकांची सेवाव्रती वृत्ती पाहिली आणि तोही तिकडे ओढला गेला. त्याने तिथे ७ वर्ष स्वयंसेवक म्हणून काम केलं. पण एका घटनेनं विशालचं पुरं आयुष्यच बदललं, त्यांची जगण्याची दिशाच बदलली..
परळीतील सोनीमोहरा गावची डाळिंबाची बाग विशालचा एक मित्र खरेदी करणार होता. त्यासाठी पैसे घेऊनच तो मित्राबरोबर सोनीमोहराला गेला. चार एकरात, गजानन पाटील या शेतकऱ्याची ती डाळिंबाची बाग होती. बाग छान बहरली होती. खूप उत्पन्न मिळणार म्हणून शेतकरी खुशीत होता. पण अचानक गारपीट आली आणि व्यवहार होणार त्याच्या आदल्या रात्रीच होत्याचं नव्हतं झालं. शेतकरी खचला आणि आणि त्याने शेतातल्याच आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. त्याची बायको जेवण घेऊन शेतात गेली. नवऱ्याने जीव दिलेला पाहून तिनेही विहिरीत उडी टाकली. त्यांचा अडीच तीन वर्षांचा मुलगा सुरज अनाथ झाला. नेते येऊन गेले, नातेवाईक आले आणि गेले. मुलाला संभाळायला मात्र कोणीच तयार नव्हतं. विशाल त्याला वसईच्या आपल्या घरी घेऊन आला. चांगल्या सुखवस्तू घरातली विशालची बायको अंकिता सुरुवातीला नाराज झाली, कशाला नसते उद्योग म्हणाली. पण आता विशालच्या खांद्याला खांदा लावून ती उभी आहे. आता मुलं नसली तर तिला करमत नाही. मुलांची काळजी घ्यायला अंकिता असल्यामुळे आता विशालही मोकळेपणी बाहेरची कामं करू शकतो. एकतीस आणि सत्तावीस वर्षांच्या या दोघांनी तारुण्यसुलभ वयातल्या भावभावना सोडून, समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यालाच अधिक महत्व दिलं आहे. त्याचे साडू सोनुराम परब यांचीही साथ आता त्याला मिळू लागली आहे.
सुरज पाटील आला तशीच आली अंकिता पागे. ती दहा वर्षांची असताना तिचा काका तिला नदीत बुडवून मारायचा प्रयत्न करीत होता. विशाल आणि काही गावकऱ्यांनी हे पाहिलं आणि अंकिताचा जीव वाचवला. मग तिचा संभाळही विशालच करू लागला. विशालच्या या कामाची माहिती मिळाल्यावर वंचित, दुर्घटनाग्रस्त, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या मुलांचा ओघच सुरु झाला. पण आता आणखी मुलं संभाळणं विशालच्या ताकदी बाहेरचं आहे. त्याची ताकद आपण वाढवू शकतो.
तीन वर्षांपूर्वी विशालने ‘साई आधार तीर्थ’ या आश्रमाची स्थापना केली आणि वज्रेश्वरीला भाड्याने जागा घेऊन तिथे मुलांची सोय केली. सुरुवातीला तो वसईला राहून मुलांची काळजी घ्यायचा आता त्यानं आपलं बिऱ्हाडही तिथेच थाटलं आहे.
त्याच्याकडची छोटी मुलं अकलोलीच्या जिल्हा परिषद शाळेत जातात तर मोठी मुलं वज्रेश्वरीच्या जिल्हा माध्यमिक शाळेत. मोठी मुलं दोन किमी पायीच जातात. छोट्या मुलांना विशाल त्याच्या बाईकवरून दोन चार फेऱ्यात पोहोचवतो.
आता विशाल, संस्था रजिस्टर करण्याच्या प्रयत्नात आहे. स्वतःच्या कमाईतून घेतलेली त्याची जागा आहे. तिथे मुलांच्या रहाण्यासाठी दोन खोल्या बांधायचा त्याचा विचार आहे. हा पावसाळा त्याला जुन्या जागेतच काढावा लागेल. घर बांधायच्या वेळी त्याला पैशाची गरज लागेल. आत्ता पैसे देऊ नका, असंच तो सांगतो. आत्ता त्याला हव्या असतात त्या दैनंदिन गरजेच्या वस्तू. त्यासाठी त्याला मदत करतात त्याच्या ताई, पार्ल्याच्या प्रगती आचरेकर. अभिनेते सचिन खेडेकर विशालला ओळखतात. विले पार्ले इथे श्रीधर फडके आणि सचिन खेडेकरांच्या एका कार्यक्रमात प्रगतीताई आणि विशालची त्यांनी ओळख करून दिली. बाबा आमटे यांची आणि विशालची भेट झाली होती. डॉ. विकास आमटे यांनाही विशालच्या कामाची माहिती होती. त्यामुळे त्यांनीही प्रगतीताईंकडे त्याच्या कामाची प्रशंसा केली आणि प्रगतीताई त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
विशालच्या कार्याची दखल जव्हारच्या संस्थानिकांनी घेऊन त्याला ‘साई सेवक’ हा पुरस्कार दिला आहे.
साईंवर त्याची मनापासून भक्ती आहे. तेच माझ्याकडून हे काम करून घेतात आणि अडीनडीला तेच कुठल्या ना कुठल्या रुपात येऊन मला मदत करतात अशी त्याची श्रद्धा आहे. त्याच्या या श्रद्धेला तडा जाणार नाही असा प्रयत्न आपण सारे करूया!
माणसातल्या देवाचं त्याला दर्शन घडवूया!!! ..मंजिरी मराठे
