Saturday, February 20, 2021

तुझी सय....

या धुंद पावसाळी.....

                  तुझी सय येते

गर्दीतल्या एकांताचे

                 माझे भय जाते

उदास माझ्या जीवनाला

               सुरेल लय मिळते.....

Sunday, February 14, 2021

अमृता प्रीतम चं मृत्यूपत्र

 अमृता प्रीतम चं "मृत्यूपत्र" !

अगदी पूर्णपणे भानावर राहून,
 निरोगी मन:स्थितीत, 
मी माझं मृत्यूपत्र लिहितेय....
माझ्या मृत्युनंतर, माझ्या घरावर धाड घाला, अगदी उलथापालथ करून, माझं घर पिंजून काढा.....
इतस्ततः विखुरलेली माझी सारी स्वप्न,
अशा स्त्रियांना देऊन टाका,
 ज्या फक्त "चूल आणि मूल" यांतच अडकल्या आहेत,
जणू त्यांना दुसरं जगच उरलेलं नाही,
स्वप्न बघणं सुद्धा त्या विसरल्या आहेत.
माझं "हसू" वृद्धाश्रमांवर पसरवा,....
ज्यांची मुलं अमेरिकेसारख्या संपन्न शहरांमध्ये हरवली आहेत ....!
माझ्या टेबलावर काही रंग पडलेत,
त्यांनी रंगू द्या अश्या साड्या,
भिजल्यात ज्यांच्या कडा
त्यांच्या पतीच्या - तिरंग्यात गुंडाळून आलेल्या शवाच्या रक्तामध्ये !
माझे अश्रू, त्या कवींना द्या,
जे प्रसवतील "कविता" प्रत्येक थेंबातून,
मला खात्री आहे.....!
माझा 'मान- सन्मान' त्या 'वेश्यांना' द्या,
ज्या, आपल्या मुलींना शिक्षण मिळावं, म्हणून, आपला देह विकतात....!
या देशातल्या प्रत्येक तरूणाला पकडून
त्यांच्या नसानसात माझा राग, संताप मिसळू द्या, 
राज्यक्रांती साठी त्यांना गरज भासेल.
माझा परमानंद त्या संतांसाठी आहे,
जे सर्वसंग परित्याग करून,
ईश्वराच्या शोधात निघाले आहेत.....
आणि शेवटी, जे काही उरेल,
माझी लालसा,
हांव, लोभ,
मत्सर, राग, द्वेष,
खोटेपणा, स्वार्थ,
हे सारं, माझ्याबरोबरच जाळून टाका !

(रूपांतर ✍️ सुजाता)

मी तुला पुन्हा भेटेन....

मूळ कविता अमृता प्रितम यांची
  "मै तनु फिर मिलांगी".....
याचा स्वैर अनुवाद

मी तुला पुन्हा भेटेन.....
 कसं, कधी माहित नाही,
 पण मी तुला पुन्हा भेटेन.....!
 लुकलुकणार्‍या तार्‍यांमधून, थंडगार वाऱ्यामधून, मी तुला पुन्हा भेटेन.
सुर्यकिरण बनून तुला कवेत घेईन,
 तुषार बनून लपेटून घेईन....
 पक्षांमधून ऐकू येईल माझाच आवाज,
अन् समुद्राच्या लाटांमधून माझीच गाज.
मी तुला पुन्हा भेटेन.
बाकी काही ठाऊक नाही,
 इतकंच माहितेय,
 काळ जे काही करेल,
 या जन्मी माझ्याबरोबर राहिल !
हा जन्म संपताच, सारे काही संपेल.....
पण मी आठवणींचे धागे गुंफेन,
आणि तुला पुन्हा भेटेन.
कधी, कसं माहित नाही,
 पण मी तुला पुन्हा भेटेन,
                मी तुला पुन्हा भेटेन.....!
✍️ सुजाता.

Friday, February 5, 2021

देव माझा

एकदा देवबाप्पा प्रसन्न झाला,
माग, हवे ते माग, म्हणाला.
मी डोकं खाजवू लागले,
काय "भारी" मागावं, 
विचार करू लागले,....
बंगला, गाडी, संपत्ती, दाग-दागिने, मुलाबाळांचं प्रेम,
सगळंच तर मिळालंय्, काय उरलंय्.....?
तरीही का अपुरं अपुरं वाटतंय्.....??
मी विचारांत पडता, देव हंसला, म्हणाला, बाळ,
मागता मागता, वाढत जातं....
कितीही मिळालं, तरी अपूर्ण वाटतं.
द्यायला लागलीस, की "पूर्ण" वाटेल !
मी दिलंय्, त्यातच समाधान मानलंस, 
तर खूप "भारी" वाटेल!
मलाही पटलं, पण मी देवाला म्हटलं
आता प्रसन्न झालाच आहेस, 
तर काहीतरी कृपा कर, की.
तूच पूर्णपणे माझा होऊन जा की!
मग बाकीचं काही मागायलाच नको,
अधूरं-अपूरं वाटायलाच नको....
देवच जर माझा झाला, 
तर सारं माझंच की....
मग सुख काय, दु:ख काय, 
सारं सारखंच की....!!
देवही प्रसन्नपणे हंसला,.....
"हुशार आहेस", म्हणाला.
तेव्हापासून, देवच माझा झाला,....
काही मागावं, हा प्रश्न च नाही उरला...!!
✍️ सुजाता.

प्रेम

प्रेम, परिपक्व वयांतलं......
गोड, पिकलेल्या फळासारखं,
जरी सुरकुतलेलं, तरी मायेनं ओथंबलेलं.
एखाद्या सुंदर फुलासारखं, पूर्ण फुललेलं.
मुग्ध, अबोल, अवखळ नव्हे, 
तर Mature, शहाणं, समजूतदार, 
समजून घेणारं.... समजावून देणारं.....!
आयुष्यातल्या फटक्यांनी अन् चटक्यांनी अनुभवी झालेलं.
न बोलतां सारं काही उमगणारं !
प्रेम, परिपक्व वयातलं.....!!
✍️ सुजाता