Friday, August 13, 2021

मुक्त

पूर्णपणे समर्पित होणारा 
भक्त व्हायचंय मला,
नाजूक फुलांचा सडा टाकून मोकळा होणारा प्राजक्त व्हायचंय मला....
मनातल्या भावना सहजपणे बोलून 
व्यक्त व्हायचंय मला,
अन्
उगीचच अडकवणाऱ्या बंधनातून 
मुक्त व्हायचंय मला.....!!
✍️ सुजाता

Sunday, August 8, 2021

जाणीव

वेगवेगळे दिवे, अन् वेगवेगळ्या "पणत्या".....
एकच देती  "प्रकाश"....  पण, त्या !
 वेगवेगळे  "घट"  जगात असती,
पण एकच त्यांची माती....!
तू,...हा ... ती अन् मी,   जरी भासती वेगळे,
एकच त्यांची "जाणीव" हे ना  आकळे.....!
✍️ सुजाता.

Thursday, August 5, 2021

साफसफाई

दिवाळी ची साफसफाई करायला घेतली,
कानाकोप-यातली जळमटं काढली .....
भिंतींना थोडी रंगरंगोटीही झाली.
चांदीची, पितळेची भांडी लखलखली,
दिव्या- पणत्यांची तयारी केली.
दिवाळी अंक आणि फराळाची ऑर्ड़र गेली....
दागिने -कपड्यांची खरेदी ही झाली....!
यंदा म्हटलं  " मनावरचीही धूळ" झाड़ायला हवी,
तरच खरी दिवाळी वाटेल नवी !
"मन स्वच्छ करणं" म्हणजे सोप्पं नव्हतं काम,
खूप ओरखड़े उमटतील, याचं  होतं मला भान !
ईर्षा -मत्सर-हेवेदावे यांचे साचले होते थरावर थर....
निगेटीव्ह विचार अन् गैरसमज त्यात घालत होते भर !
राग -लोभ -मोह यांचा गाळ होता साचलेला....
पण सगळा कचरा काढण्याचा मी निश्चयच केलेला !
काहींची मागितली माफी, अन् काहींना केलं माफ.... (अर्थातच, -- मनातल्या मनांत !!)
आता मात्र मन माझं, झालं अगदी साफ !
सकारात्मक विचार आणि समंजसपणा यांचं औषध फवारलं,
माझ्या मनाचं शेत आता चांगलंच  फुलारलं !
ठाऊक आहे मला, मी नाही कोणी संत....
मनांत पुन्हा निराशेचे तण माजतील, याची आहे मला खंत.
ओशोंची प्रवचनं, मेड़िटेशन, प्रार्थना यांची सतत पेरणी 
सुढृढ मनाची करेल निगराणी !
मीच जर आहे माझ्या आयुष्याची शिल्पकार...
मग माझ्या आनंदाला- आणि हो, दुःखालाही मीच जबाबदार  !!
शरीराप्रमाणेच मनाचंही आरोग्य जपलं पाहीजे, हे मला पटलं....
मी मलाच स्वतःला मनाच्या मेंटेनन्स चं contract देऊन टाकलं !!!
--✍ सुजाता.