" चल रे भोपळ्या टुणुक टुणुक "
लेकीकडे जाऊन जाडजूड होऊन परत आलेल्या म्हातारीची गोष्ट सगळ्यांनी लहानपणी ऐकलीच असेल. आत्ताच्या काळात सुद्धा अशीच एक म्हातारी ( जरी ती स्वतःला म्हातारी समजत नसली, तरी ) सातासमुद्रापार लंडनला लेकीकडे जाऊन, शरीराने धष्टपुष्ट आणि मनाने संतुष्ट होऊन आली, तिची ही गोष्ट......
या म्हातारीला जेव्हा समजले की तिची, पार सातासमुद्रापलीकडली लेक छोटं बाळ आणणार आहे, तेव्हा ही सरळ उठली आणि लेकीला बाळंतपणासाठी मायदेशी घेऊन आली. पंजाबी ड्रेस ला नसलेला पदर खोचून, तिने आयाबायांच्या मदतीने, लेकीचे बाळंतपण आणि नंतर नातीचे बारसे अगदी थाटामाटात केले !
सगळ्या आजी-आजोबांच्या आणि मामा- मावशींच्या लाडाकोडात नात वाढू लागली. पण आता लेकीची कर्मभूमीकडे जाण्याची वेळ झाली. त्याबरोबर परत ही म्हातारी, जीन्स ला नसलेला पदर खोचून, नाती बरोबर लेकीच्या घरी निघाली.
एअरपोर्टवरच्या कस्टम ऑफिसरच्या रूपातील वाघोबा आणि लांडग्यांनी म्हातारीला अडवले, पण ही काही घाबरली बिबरली नाही. तिने वाघोबांना ठणकावून सांगितले की ती फक्त नातीला तूप रोटी खिलवायला आली आहे !
परदेश तसा म्हातारीला नवखा नव्हता, पण यावेळी ती आजीच्या भूमिकेतून सर्व पहात होती.
मायदेशात गणपतीचा सण तिचा हुकला खरा, पण परदेशातल्या महाराष्ट्र मंडळात, खणखणीत आवाजात गणपतीला मंत्रपुष्पांजली वाहून तिने हौस भागवून घेतली !
नातीचा पहिला वाढदिवस सुद्धा तिने मोठ्या जोमात साजरा केला. नंतर दिवाळीला, मायदेशातून आलेल्या कंदील- फराळ आणि पणत्या, यांनी दिवाळी सण सुद्धा झगमगून टाकला !
आजी नातीला तूप रोटी खिलवत होती, पण लेक आणि जावई तिला पिझ्झा- पास्ता- Croissant , लझानिया, आणि काय काय खिलवून जाडजूड करत होते. पण तिची नात मात्र तिला " On her toes " ठेवत होती !
म्हातारीला भेटण्यासाठी खास, तिचा भाऊ आणि वहिनी फार लांबून कॅनडाहून आले आणि म्हातारीने त्यांच्याबरोबर 'जीवाचे लंडन' केले !
हे कमी म्हणून की काय लेकीने तिला स्कॉटलंडला फिरवून आणले. आजी नातीबरोबर शब्दशः Chill करीत होती ! एवढ्या सगळ्या घडामोडींचे वर्ष बघता बघता संपले. आजीने लेकी बरोबर सरत्या वर्षाला बाय बाय केले आणि नाती बरोबर नवीन वर्षात आणि नवीन 'विश्वात' पदार्पण केले !
आता मात्र म्हातारीला माय देशाची ओढ लागली. तिथे तिची माणसं, तिच्या मैत्रिणी आणि तिचे कार्यक्रम तिला साद घालू लागले. तिने आपली बॅग भरायला घेतली.
जड मनाने आणि जड बॅगेने, आजी परतीच्या प्रवासाला निघाली. यावेळी मात्र भोपळ्यातून न जाता तिने भोपळ्या एवढ्याच मोठ्या जंबो जेट ने जायचे ठरवले.
परतताना नेहमीप्रमाणेच कस्टम्स वरच्या वाघ -सिंह आणि लांडग्यांनी तिला अडवले. पण पुन्हा म्हातारी अजिबात घाबरली नाही ! आपला दोन वर्षांचा लंडनचा Visa दाखवून
"मी पुन्हा येईन ......!"
असे तिने त्यांना ठणकावून सांगितले.
विमानात म्हातारीच्या हातातल्या मोबाईल मध्ये भूतकाळातल्या आठवणी -फोटो - होते आणि डोळ्यांमध्ये भविष्याची स्वप्ने......!
एवढ्यात विमानातल्या हवाई सुंदरीने म्हातारीला 'वर्तमानात' आणले.
"What would you like to have Ma'am, tea or coffee ?"
असे तिने विचारताच म्हातारी सराईतपणे उत्तरली.....
"One hot Caffe' Latte, Please "
- ✍️ सुजाता
