Friday, November 29, 2024

 लेक कधी मोठी होत नाही, आणि 

आईचं आईपण कधी सरत नाही.

 लेकीला मुलगी झाली, आई आजी झाली,

 तरीही आईपण कधीच सरत नाही.

हां, कधी कधी लेक आईचीच आई होते,

पण नात आजीला कधी म्हातारं होऊ देत नाही. 

लेक कधीच मोठी होत नाही,

आणि आईपण कधी संपत नाही  !

✍️ सुजाता

Tuesday, April 30, 2024

कवितेला कधी जाऊदे म्हणायचं नसतं....

"प्रिय भाई एक कविता हवी आहे"
एक सर्वांग सुंदर अनुभव......!

कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं हे एकदम पटलं !
 माझ्या शब्दात.....👇

कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!
आकाश गडगडतं, आणि काळे ढग साचतात..... तेव्हा मनाचं कवाड बंद करायचं नसतं,
शब्दांच्या वर्षावात मनसोक्त न्हावून घ्यायचं असतं 
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!

चाफ्याचं झाड जेव्हा स्वप्नात येतं, तेव्हा
ओंजळ फुलांनी भरून घ्यायची असते.
कवितेचा आनंद आणि सुगंध पसरवायचा.
कैवल्याच्या चांदण्यांचं लेणं अंगभर मिरवायचं,
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!

आठवणींवर साठवलेली धूळ झटकायची,
कवितेचा शोध चालूच ठेवायचा !
कवितेचं देणं आणि घेणं लुप्त होऊ द्यायचं नसतं.
कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं नसतं.....!
✍️ सुजाता

Saturday, January 13, 2024

या प्रेमाचं काय करायचं ?......

*या प्रेमाचं काय करायचं.....?*
या प्रेमाचं काय करायचं.....
ते एकतर असतं, किंवा अजिबात नसतं,
ते ठरवून होत नै,
आणि जबरदस्तीनी तर जराही होत नै.
ते लपवता येत नै,
आणि त्याचा दिखावा पण करता येत नै.
तू केलंस, तरच मी करीन, असा Business करता येत नै,
की मी करत्येय, म्हणून तू पण कर, अशी सक्ती पण करता येत नै.
हिला त्याच्यावर आणि त्याला माझ्यावर प्रेम कर असं सांगता येत नै,
तसंच, त्याच्यावर करू नकोस, असं Emotional Blackmail ही करता येत नै.
मग या प्रेमाचं करायचं तरी काय ....?
तर ते नुस्तं Enjoy करायचं.....
मनसोक्त हुंगायचं.... त्याचा आनंद लुटायचा...!
अटींपलीकडे करायचं,
मरेपर्यंत करायचच, पण मेल्यावरही करायचं ! 
प्रेम जगायचं !!
मला तर वाटतं, Meditation प्रमाणेच
प्रेम करायचं नसतं, तर ते आपोआप होत असतं...!
मी प्रेम करते, असं नव्हे, 
तर मीच प्रेम आहे !!
✍️ सुजाता.