Friday, July 22, 2016

मुलगी वाचवा ....

✔ मुलगी वाचवा...
मुलगी वाचवा ... मुलगी वाचवा .. ..
कशाला  वाचवा...?
आणि  कुणाकुणापासून  वाचवा ....?
गर्भातच  गळ्याला नख
लावणाऱ्या  आईबापांपासून  वाचवा....?
की बालवयात तिचं  शोषण 
करणाऱ्या  आप्तजनांपासून  वाचवा ...?
अल्पवयातच पाशवी बलात्कार
करणाऱ्या  'जात्यांधांपासून '  वाचवा ...?
हवे त्या शाखेत शिक्षण मिळण्यापासून
वंचित करणाऱ्या शिक्षण संसथेपासून  वाचवा..?
की हुंड़यासाठी  छळ करणाऱ्या
सासरच्यांपासून  वाचवा ...?
कुणाकुणापासून  मुलगी  वाचवा....
आणि कसे वाचवा ? कुठपर्यंत  वाचवा ...??
जोपर्यंत,  मुलगी स्वतःच  'वाचून' 
स्वतःला वाचवेल,....
स्वतःचं  नशीब  स्वतःच   'लिहून '
सटवाईला  वाचायला लावेल,....तोपर्यंत...!
खरंतर मुलगीच जगाला,
अंतीम विनाशापासून  वाचवेल .....!!
--✏सुजाता

Sunday, July 10, 2016

साथ

   हा प्रवास  कधी संपूच  नये,
   मंजिल कधी येऊच नये !
   तुझी साथ फक्त या वाटेपुरतीच असेल तर
   ही  वाट कधी  सरूच  नये.....
   तू  स्वप्नातच  आला असशील, तर
   मला  जाग  कधी येऊच  नये,..
   हा  केवळ  भासच  असेल  तर,
   मी  वास्तवात  कधी  जगूच  नये....!!