Wednesday, June 1, 2016

विशाल परुळेकर

अनाथांचा मायबाप आधार..
Leave a reply
​मुंबईच्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरीतील नदी काठची एक खोली. अगदी काल परवापर्यंत या खोलीला छप्पर नव्हतं. भिंतीही ढासळलेल्या होत्या. पण कोणातरी सुहृदानं पत्रे पुरवले आणि त्या पडीक वास्तूला घराचं रूप आलं. भिंतीला गिलावाही नाही, रंग तर दूरचीच गोष्ट पण जमीन मात्र शेणानं छानशी सारवलेली. खोलीच्या बाहेर स्वयंपाकघर.. म्हणजे त्या खोलीच्या बाहेर भिंतीशी चूल, थोडीशी भांडी आणि ऊन पावसापासून बचावासाठी वर ताडपत्री, तीन बाजूंना भिंती नाहीतच. एवढया टळटळीत उन्हात थोडासा गारवा देणारा, कोणीतरी दिलेलाच एक कव्हर नसलेला छोटासा टेबल फ़ॅन. ही जागा पछाडलेली असा समज असल्यामुळे बेवारशी पडली होती. पण आता तिथे  राहतो विशाल परुळेकर, त्याची बायको अंकिता आणि त्यांची 48 मुलं. हो त्याचीच मुलं. कारण या मुलांसाठी तोच एक मायबाप आधार आहे. २४ मुली, २४ मुलं. वय वर्ष ४ ते १६. काही विदर्भ मराठवाड्यातली तर काही जव्हार, मोखाडा, तलासरी या आदिवासी पट्यातली.

विशालची आई तो दीड वर्षाचा असतानाच वारली, वडील व्यसनाधीन त्यामुळे हलाखी, खाण्यापिण्याची, शिक्षणाची आबाळ, जगण्यासाठीची धडपड त्याने अनुभवली आणि आपल्या सारखं जीणं जगणाऱ्यांचा तो मायबाप आधार झाला. त्यांचं फक्त जेवणखाणच तो करत नाही, तर त्यांना शिकवतो आहे, त्यांना घडवतो आहे.

कायम शिव्याच तोंडात असलेली ही मुलं आता श्लोक म्हणतात. या मुलांसाठी काहीना काही घेऊन आलेले पाहुणे हे देवासारखे आहेत असं विशाल त्यांना समजावतो आणि मग मुलं समोर डोळे मिटून, हात जोडून बसतात  आणि ‘मला हे दत्तगुरु दिसले’ हे गाणं म्हणतात.

तिथे सकाळी ९ च्या आत आलेल्या पाहुण्यांना कोरा चहा (कारण दूध उशीरा येतं) रानमेवा दिला जातो, पोह्याचा आग्रह होतो. मुलांना दूध देणं शक्य नाही म्हणून विशाल कोरा चहाच पितो.

विशाल या मुलांसाठी कपडे, धान्य, कडधान्य, वह्या, पुस्तकं जमा करून आणतो. मग हेच कपडे धूऊन, इस्त्री करून, नव्याचं रूप देऊन त्या मुलांना सणासुदीला भेट करतो. तो आणि अंकिताही असेच जुने कपडे वापरतात. घरात किती अन्नधान्य आहे याकडे मोठ्या मुलांचं लक्ष असतं. मुलं इतकी समजूतदार आहेत की घरातला धान्याचा साठा कमी झाला की आपोआपच त्यांची भूकही कमी होते. तरीही अगदीच काही सोय झाली नाही तर नदी आहेच. मग कोणीतरी दिलेल्या मच्छरदाणीचा उपयोग, मासे पकडण्यासाठी करण्याची शक्कल मुलंच लढवितात आणि तो दिवस छान साजरा होतो.

आलेल्या पाहुण्यालाही विन्मुख पाठविलं जात नाही. मुलांनीच पिकविलेल्या कांद्याची माळ, झाडावरून काढलेला रानमेवा त्यांना भेट दिला जातो.

वडिलांच्या वसईतील प्रिंटिंग प्रेसला किंवा त्याची भागीदारी असलेल्या शिर्डीतील हॉटेलला काही व्यवसाय मिळवून दिला तर जे कमिशन मिळतं त्यावर मुख्यत्वे त्याचा उदरनिर्वाह चालतो.

विशाल SY BA पर्यंत शिकला. शिर्डीत मित्राच्या जोडीने त्याने हॉटेल व्यवसायही सुरु केला. व्यवसाय चांगला सुरु झाला, पैसे मिळू लागले, सुखाचे दिवस आले.

गोरेगावच्या डॉ. जगदीश सामंत यांच्या वालीव (वसई) इथल्या कुष्ठरोग्यांसाठीच्या संस्थेत विशालचे काका डॉ. विकास परुळेकर कार्यरत होते. तिथे त्याने काकांची सेवाव्रती वृत्ती पाहिली आणि  तोही तिकडे ओढला गेला. त्याने तिथे ७ वर्ष स्वयंसेवक म्हणून काम केलं. पण एका घटनेनं विशालचं पुरं आयुष्यच बदललं, त्यांची जगण्याची दिशाच बदलली..

परळीतील सोनीमोहरा गावची डाळिंबाची बाग विशालचा एक मित्र खरेदी करणार होता. त्यासाठी  पैसे घेऊनच तो मित्राबरोबर सोनीमोहराला गेला. चार एकरात, गजानन पाटील या शेतकऱ्याची ती डाळिंबाची बाग होती. बाग छान बहरली होती. खूप उत्पन्न मिळणार म्हणून शेतकरी खुशीत होता. पण अचानक गारपीट आली आणि व्यवहार होणार त्याच्या आदल्या रात्रीच होत्याचं नव्हतं झालं. शेतकरी खचला आणि आणि त्याने शेतातल्याच आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. त्याची बायको जेवण घेऊन शेतात गेली. नवऱ्याने जीव दिलेला पाहून तिनेही विहिरीत उडी टाकली. त्यांचा अडीच तीन वर्षांचा मुलगा सुरज अनाथ झाला. नेते येऊन गेले, नातेवाईक आले आणि गेले. मुलाला  संभाळायला मात्र कोणीच तयार नव्हतं. विशाल त्याला वसईच्या आपल्या घरी घेऊन आला. चांगल्या सुखवस्तू घरातली विशालची बायको अंकिता सुरुवातीला नाराज झाली, कशाला नसते उद्योग म्हणाली. पण आता विशालच्या खांद्याला खांदा लावून ती  उभी आहे. आता मुलं नसली तर तिला करमत नाही. मुलांची काळजी घ्यायला अंकिता असल्यामुळे आता विशालही मोकळेपणी बाहेरची कामं करू शकतो. एकतीस आणि सत्तावीस वर्षांच्या या दोघांनी तारुण्यसुलभ वयातल्या भावभावना सोडून, समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यालाच अधिक महत्व दिलं आहे. त्याचे साडू सोनुराम परब यांचीही साथ आता त्याला मिळू लागली आहे.

सुरज पाटील आला तशीच आली अंकिता पागे. ती दहा वर्षांची असताना तिचा काका तिला नदीत बुडवून मारायचा प्रयत्न करीत होता. विशाल आणि काही गावकऱ्यांनी हे पाहिलं आणि अंकिताचा जीव वाचवला. मग तिचा संभाळही विशालच करू लागला. विशालच्या या कामाची माहिती मिळाल्यावर वंचित, दुर्घटनाग्रस्त, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या मुलांचा ओघच सुरु झाला. पण आता आणखी मुलं संभाळणं विशालच्या ताकदी बाहेरचं आहे. त्याची ताकद आपण वाढवू शकतो.

तीन वर्षांपूर्वी विशालने ‘साई आधार तीर्थ’ या आश्रमाची स्थापना केली आणि वज्रेश्वरीला भाड्याने जागा घेऊन तिथे मुलांची सोय केली. सुरुवातीला तो वसईला राहून मुलांची काळजी घ्यायचा आता त्यानं आपलं बिऱ्हाडही तिथेच थाटलं आहे.

त्याच्याकडची छोटी मुलं अकलोलीच्या जिल्हा परिषद शाळेत जातात तर मोठी मुलं वज्रेश्वरीच्या जिल्हा माध्यमिक शाळेत. मोठी मुलं दोन किमी पायीच जातात. छोट्या मुलांना विशाल त्याच्या बाईकवरून दोन चार फेऱ्यात पोहोचवतो.

आता विशाल, संस्था रजिस्टर करण्याच्या प्रयत्नात आहे. स्वतःच्या कमाईतून घेतलेली त्याची जागा आहे. तिथे मुलांच्या रहाण्यासाठी दोन खोल्या बांधायचा त्याचा विचार आहे. हा पावसाळा त्याला जुन्या जागेतच काढावा लागेल. घर बांधायच्या वेळी त्याला पैशाची गरज लागेल. आत्ता पैसे देऊ नका, असंच तो सांगतो. आत्ता त्याला हव्या असतात त्या दैनंदिन गरजेच्या वस्तू. त्यासाठी त्याला मदत करतात त्याच्या ताई, पार्ल्याच्या प्रगती आचरेकर. अभिनेते सचिन खेडेकर विशालला ओळखतात. विले पार्ले इथे श्रीधर फडके आणि सचिन खेडेकरांच्या एका कार्यक्रमात प्रगतीताई आणि विशालची त्यांनी ओळख करून दिली.  बाबा आमटे यांची आणि विशालची भेट झाली होती. डॉ. विकास आमटे यांनाही विशालच्या कामाची माहिती होती. त्यामुळे त्यांनीही प्रगतीताईंकडे त्याच्या कामाची प्रशंसा केली आणि प्रगतीताई त्याच्या पाठीशी खंबीरपणे  उभ्या राहिल्या.

विशालच्या कार्याची दखल जव्हारच्या संस्थानिकांनी घेऊन त्याला ‘साई सेवक’ हा पुरस्कार दिला आहे.

साईंवर त्याची मनापासून भक्ती आहे. तेच माझ्याकडून हे काम करून घेतात आणि अडीनडीला तेच कुठल्या ना कुठल्या रुपात येऊन मला मदत करतात अशी त्याची श्रद्धा आहे. त्याच्या या श्रद्धेला तडा जाणार नाही असा प्रयत्न आपण सारे करूया!

माणसातल्या देवाचं त्याला दर्शन घडवूया!!! ..मंजिरी मराठे

No comments: