Monday, March 22, 2021

भूमिका

किती भूमिका केल्या,....
मुलीची,... विद्यार्थिनीची,
पत्नीची,.... सुनेची,....
आईची, प्रतिष्ठेची, मानमरातबाची... 
किती वेळा मेकअप लावला, काढला, बदलला,.....
किती प्रवेश झाले, 
किती अंक झाले,......
कुणास ठाऊक....
आणखी किती बाकी आहेत, कुणास ठाऊक,....
कोणता प्रवेश शेवटचा, कुणास ठाऊक.....
ती ती भूमिका समरसपणे केली.... किती जमली, किती फसली,
कुणास ठाऊक .....
कधी स्वतःला बक्षीस दिलं,
कधी कोसलं,.... टोकलं....
पण भूमिका वठवत राहिले.
एकदा मेकअपच पुसला, 
रागावून, हताश होऊन.....
वाटलं संपवावं नाटक,
पाडावा पडदा,....
पण पडदा पडलाच नाही,
नाटक चालूच,.... समोर प्रेक्षक.... 
मग पुन्हा उठून रोल निभावला, निभवावा लागला.....
पण आता थकले,
डायलॉग पाठ करून,
प्रखर लाइट्स अंगावर घेऊन आणि स्टेजवर उभ राहून राहून ही. 
आता वाटतय बसावं हळूच,
मागे सटकावं....
काही पात्रांच्या लक्षात येईल,
काही प्रेक्षकांनाही समजेल....
पण मग मी दिसलेच नाही की हळूहळू सरावतील....
इतर पात्रही, आणि प्रेक्षकही.
नाटक पुढे चालूच राहील,....
जणू कथेत काही वळण येईल.... 
इतर पात्रं कदाचित माझी वाक्य बोलतील,....
काही वाक्य गाळतील....
पण कथा पुढे सरकत राहिल....
मी फक्त रंगमंचावरून बाजूला सरेन,
कदाचित मीच प्रेक्षक होईन,....
 कदाचित प्रेक्षागृहाच्याही बाहेर जाईन,
मोकळं खुलं आकाश पाहीन... चित्र काढीन, कविता करेन,
गाईन, नाचीन.... आनंदात....!!!
✍️ सुजाता.

No comments: